‘आलमगीर’ म्हणवून घेणार्‍याची कबर महाराष्ट्राने बांधली : शहा   

रायगड : स्वतःला आलमगीर म्हणवून घेणारा औरंगजेब महाराष्ट्रात पराभूत झाला आणि महाराष्ट्राने इथेच त्याची कबर बांधली, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य अद्वितीय आहे. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत, असेही शहा यावेळी म्हणाले.
 
शिवाजी महाराजांचे स्वधर्म आणि स्वराज्य हे आदर्श भारताला महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला प्रेरणा देत आहेत. नरेंद्र मोदी सरकार शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर काम करते, असेही ते म्हणाले.मी आतापर्यंत अनेक युगपुरुषांची जीवन चरित्रे वाचली आहेत. पण, प्रचंड इच्छाशक्ती, धाडस, अकल्पनीय रणनीती आणि रणनीती पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाला एकत्र जोडून अपराजित सेनेची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली, असेही शहा यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्त रायगडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती उदयनराजे भोसले, राज्यमंत्री शिवेंद्रसिंह भोसले आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शहा यांना कवड्यांची माळ आणि पगडी देऊन सन्मान करण्यात आला.जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर, त्यांना स्वराज्याचा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे महान कार्य त्यांनी केले. स्वराज्य आणि स्वधर्मासाठी शिवाजी महाराजांनी आयुष्य वेचले. आदिलशाही आणि निजामशाहीने वेढलेल्या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्यात रुपांतरीत करण्याचे महान कार्य केले.  
 
स्वतःला आलमगीर म्हणवून घेणार्‍या औरंगजेबाचा महाराष्ट्रात पराभव झाला. त्याची कबरदेखील येथेच आहे. शिवचरित्र प्रत्येक भारतीयाला शिकवले गेल पाहिजे. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतेच मर्यादित ठेवू नका. संपूर्ण देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे, असेही शहा यावेळी म्हणाले.  फडणवीस यांनी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यासाठी त्यांच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तर, उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी केली. 
 
छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी लोकमान्यांचा संघर्ष
 
किल्ले रायगडावरील भाषणात अमित शहा यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला. लोकमान्य टिळकांनी रायगड या पुण्यभूमीला स्मृतीस्थळ बनविण्यासाठी, रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी संघर्ष केला, असे ते म्हणाले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, अशी सिंहगर्जना करुन लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवरायांचा स्वराज्य मंत्र सर्वत्र पोहोचवला, असे त्यांनी नमूद केले.

Related Articles